*रक्ताची नाती कधी तुटत नसतात, फक्त स्वतःचा इगो आणि अहंकार काबूत ठेवायला हवा*


दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्यावर पुस्तक वाचायला बसलो होतो. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं सर्वत्र स्मशान शांतता होती. भर दुपारची वेळ होती, चांगलच कडकडीत ऊन होतं. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड व तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल, जरा जवळ आल्यावर बघितलं तर माझा अंदाज खरा ठरला, ती माझी चुलतीच होती. मी बघून न बघितल्या सारखे केले आणि पुस्तकात डोकं घातलं. 

चुलती माझ्यासमोरून हळू हळू चालत गेली, हे मला जाणवलं, पण मी लक्ष दिले नाही. 

गेल्या साधारण आठरा वर्षांपासून आमचं बोलणं नाही. चुलतीनेच बोलणं बंद केलं होतं. आमच्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता, चुलत्यात आणि माझ्या वडीलात. 

वडील जाऊन आता पाचएक वर्षे झाली, घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला मिळाला होता.

आम्ही वरती बांधून प्रशस्त, व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती दोघंच राहायची. दोन घराच्या मधोमध एक भिंत बांधली होती चुलत्यानं. 

वाटणीच खूळ खरंतर चुलतीनच काढलं होत, पण आम्ही दोघेही भाऊ यात कधी लक्ष देत नसतो, आम्ही बरे आणि आमचं घर बरं एवढंच. कधी येणं जाणं नाही, बोलणं नाही. 

वडीलांना मात्र याची खंत सतत भेडसावत असे. मृत्यू समीप आला तेव्हा शेवटच्या क्षणी सुद्धा एकच सांगून गेल  "माझ्या भावाला अंतर देऊ नका, तो चुकला असेल पण माझा भाऊच आहे ना!"  त्यांची ही शेवटची तळमळ पाहून आम्हालाही अतीव दुःख झाले होते. वडिलांची ही शेवटची इच्छा आईलाही सतत अस्वस्थ करीत असे.

थोड्यावेळाने चुलती परत बाहेर आली आणि नाक्यापर्यंत जाऊन तिथेच घुटमळत राहिली. बहुतेक तिला मला काही सांगायचं असावं असं जाणवलं. मी गाडी काढली आणि तिच्या समोर गेलो. ती औषधाची पाकिटं हातात घट्ट धरून उभी होती. तिला विचारलं "काय ग काकू काय झालं?"  काकू रडवेली होऊन थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, *"अरं! तुझ्या काकाच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात. दोन दिवस झाले लै त्रास होतोय त्यांना. ना गाडी मिळत ना रिक्षा, सगळं बंद आहे."* मी म्हटलं बघू देत त्या! तिनं जुनी पाकीटं आणि दोनशे रुपयांची नोट माझ्या हातात दिली आणि म्हणाली जमल्यास अर्धा किलो डाळ पण घेऊन ये. मी पिशवी आणि पैशे घेऊन गाडीवर निघालो. 

चुलतीला एक मुलगा सुनील व एक मुलगी तिला आम्ही चिमू म्हणायचो. सुनीलला आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो, एकत्र खायचो. बंटी आणि चिमू मला दादू म्हणायचे. पण या वादानंतर, सगळं येणजाणच बंद झालं होतं.

फार जीव होता माझ्या आईचा त्या दोघांवर. छोटी चिमू फार गोड होती तर बंटीही खूप खोडकर पण लाघवी. चिमू आता लग्नानंतर परदेशात असते तर बंटी कलकत्यात असतो. लव मॅरेज करून तो तिकडेच सेटल झालाय. मागच्यावेळी चिमू आली तेव्हा तो पण दिसला होता, पण त्यानंतर परत काही आला नाही. 

चुलता भूसंपादन विभागातुन सेवानिवृत्त झाला आहे, पेन्शनपण चांगली असावी. आता उतारवयात बऱ्यापैकी थकलेत. आम्हालाही त्यांची काळजी वाटते पण काकू नेहमीच झटकून असायच्या. 

ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आले कळालच नाही. 

दोन महिन्यांच्या गोळ्या एकदमच घेतल्या. बाजूच्याच  किराणा दुकानातून डाळी, तांदूळ आणि इतर सर्व वस्तू घेऊन निघालो. घरा समोर गाडी लावली, आई गेटसमोरच उभी होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता, त्यांनी माझ्याकडे बघितलं, डोळ्यांत कारुण्य होतं. 

भिंतीवर वडिलांचा फोटो लावलेला होता. कुंकू लावलेल्या त्यांच्या फोटोला बघून माझं मनपण भरून आलं. शेवटी भावाचं प्रेम होतं ते.

पिशवी काकूकडे दिली, ती पण खूप भारावली होती. चुलता उठला, माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वत:ला सावरून  *"एवढं सगळं आणलंस, घरात खरंच काहीच नव्हतं रे! वरचे किती पैसे देऊ?"* मी दोनशेची नोट तिच्या हातात ठेवत राहू दे म्हणालो. *"सगळं ह्या पैश्या पायीच झालंय ग काकू!"* न राहवता काकू माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकल्या, लहानपणी तो असाच माझ्या खिशात काहीबाही गपचिप टाकायचा, हे आठवलं मला. चुलताही विसरला नव्हता. मी सावरलो, "चला येतो मी काय लागलं सवरलं तर हाक मारा!" असं म्हणून मी बाहेर आलो. 

आईनं फाटक उघडलं. आत गेलो, आईचे डोळे पाणावलेले होते. तिनं माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावला.

दिवस हळू हळू निघून जात होते, मी कधी काय आणायला बाहेर जायचो तेव्हा काकू यायची, खिश्यात पैसे ठेवतं आणि पिशवी देऊन काय हवं नको ते सांगायची.

आता काकू बऱ्यापैकी सावरली होती. हे असं साधारण तीनएक आठवडे चाललं होतं. पण आज अचानक सकाळीच पलीकडील भिंतीवर जोरजोरात मारल्याचा आवाज येऊ लागला. आम्ही सर्व उठून बाहेर गेलो बघतो तर काय चुलती घराबाहेर रडत उभी होती. मी विचारायच्या आताच ती रडतच सांगू लागली, "बघना रे दादू , हे कसं करायला लागलेत ते. रात्रभर झोपलेच नाहीत, आणि आता हे भिंत तोडणं चालू केलंय."   मी, आई आणि लहान भाऊ पटकन तिकडे गेलो. चुलता पहार घेऊन मधली भिंत तोडण्याचा प्रयत्न करीत होता. खरं तर तो थर थर कापत होता आणि  घामाने पार डबडबला होता. आईला पाहून तो पहार बाजूला टाकून पटकन फुढे येऊन हात जोडत, आईकडे बघत काकुळतेने म्हणाला *"माफ कर मला वैने!* असं म्हणत मटकन खालीच बसला. ओक्सा बोक्सी रडू लागला. आईच्याही डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातपण अश्रू तरळत होते. 

चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून, त्यालाही कळलं होतं की आईने त्याला कधीच माफ केलं आहे.

शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात हेच खरं. अखेर घर एकत्र आलं होतं. आम्ही दोन्ही भावानी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि तो कायम मनाशी बांधून ठेवला.

*जगाचे लॉकडाउन कधी संपेल माहीत नाही पण आमच्या दोन घरांच्या मधला लॉकडाऊन संपला होता परत कधी बंद न होण्यासाठी*

36 views0 comments