Shree Swami Samarth

माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.

देवदूत


वसुधा सकाळपासूनच अस्वस्थ होती. कामात लक्षच न्हवतं तिचं.. त्यामुळंच की काय दूध उतू गेलं, भाजीत मीठ कमी पडलं, तिच्या या धांदलीमुळे उशीर झाला म्हणून सिद्धार्थची झालेली चिडचिड तर तिने ऐकलीच नाही.

राजस सोसायटी मधलं सिद्धार्थ आणि वसुधा हे एक देखणं, समंजस आणि सधन असं जोडपं होत. सगळ्यांनाच त्यांचा हेवा वाटायचा. दोघांची चांगली नोकरी , सुशिक्षित आणि प्रेमळ आई वडील , स्वतःच्या कमाईच्या जोरावर घेतलेला नवीन फ्लॅट सगळं कसं छान होत पण दुःख म्हणावं तर एकच, लग्नाला पाच वर्षे झाली तरी घरात पाळणा हलला न्हवता. दोघांच्याही आई वडिलांना आजी आजोबा व्हायची घाई होतीच त्यामुळं अडून अडून ते ही विचारायचे याबद्दल.. आणि ते दोघे काहीतरी कारण काढून विषय टाळायचे... पण एकमेकांना ते टाळू शकत न्हवते. एकांतात असले की या एकाच विचाराने वसुधाचे मन खट्टू व्हायचे. जवळपास तिच्या सगळ्या मैत्रिणी 'दोनाच्या तीन'झालेल्या होत्या त्यामुळं ती जास्त दुःखी व्हायची. सिद्धार्थ तिला समजवायचा, " होईल गं बाळ, आपलं काही वय नाही झालं अजून". तेवढ्यापुरती ती विसरायची सगळं पण पुन्हा तेच. हळू हळू देव धर्म, डॉक्टरकडच्या फेऱ्या सगळं वाढू लागलं. घरातला आनंद नकळतच नैराश्यात बदलत गेला. तरीही एक गोष्ट मात्र वसुधा नियमाने करायची, ती म्हणजे स्वामींचा जप.. लहानपणापासून तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती. जमेल तेव्हा ती अक्कलकोटला जाऊन यायची...लग्नाआधी आई बाबांसोबत आणि आता सिद्धार्थला घेऊन. तो फार देवभोळा नसला तरी नास्तिक ही न्हवता. तिच्या श्रद्धेबद्दल त्याला आदर होता.

मागच्या वर्षी असेच ते नियमाप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेले असताना एक विचित्र घटना घडली. दोघेही मंदिरात बसले असताना पन्नाशीच्या आसपासची एक बाई त्यांच्या शेजारीच बसली होती, दिसण्यावरून चांगल्या घरातली वाटत होती. या दोघांच बोलणं ऐकून तिने मधेच प्रश्न केला, "कुठून आलात?"

वसुधा :- "पुण्याहून आलोय , दरवर्षी येतो ".

ती बाई :- "स्वामींवर श्रद्धा दिसते तुमची"

वसुधा :- " हो, लहानपणापासून.."

बऱ्याच गप्पा झाल्यावर सिद्धार्थ वसुधा तिथून निघाले. वाटेत जाताना सिद्धार्थ वसुधाला म्हणाला,"ती बाई जरा जास्तच चौकशा करत होती ना..कोण कुठली काय माहित , आणि तू ही सगळं सांगत बसलीस तिला". वसुधाने सिध्दार्थचे बोलणे फारसे मनावर नाही घेतले. रात्री अन्नछत्रात प्रसादावेळी परत तीच बाई वसुधाच्या समोर जेवायला बसली. वसुधा नुसतीच हसली तिच्याकडे बघून. पण का कुणास ठाऊक त्या बाईचा चेहरा खूप प्रसन्न आणि शांत वाटला तिला. तिथून बाहेर पडल्यावर ती बाई वसुधाला शोधत आली आणि म्हणाली, "पहाटे आरतीला ये बरं का?" वसुधाला मनात वाटून गेलं की, का ही बाई आपल्या मागे मागे करतेय?..

"अगं येतेयस ना?" त्या बाईच्या हाकेने वसुधाला जाग आली, बघते तर आसपास कुणीच नाही,सिद्धार्थ झोपलेला होता. तिला वाटलं काल दिवसभर त्या बाईचा विचार करून स्वप्नात पण तीच दिसली. पण काही केल्या तिला झोप लागेना. काहीतरी मनाशी ठरवून ती उठली,अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेल्यावर बघते तर गरम पाणी अजून आलं न्हवतं. तशीच गार पाण्याने अंघोळ करून तिने आपलं आवरलं. सिध्दार्थला उठवायचा त्रास तिने घेतला नाही कारण तो काही इतक्या पहाटे गार पाण्याने अंघोळ करून देवळात आला नसता. दार लावून घेऊन ती झपझप पावले टाकत देवळाकडे निघाली. भक्त निवास तिथून जवळच असल्यामुळे कुणाच्या सोबतीची तिला गरज नाही वाटली. बाहेर अंधार होता ती खाली मान घालून रस्त्याचा अंदाज घेत निघाली होती. तेवढ्यात मागून ,"शुक शुक" केल्याचा आवाज तिला ऐकू आला, जागच्या जागी वसुधा थबकली. तेवढयात ती कालची बाई कुठून तरी आली आणि म्हणाली, "घाबरू नकोस मी आहे".. वसुधाला , हायसे वाटले आणि त्या दोघी काकड आरतीसाठी देवळात निघाल्या. आरती सुरू असताना एक वेगळाच रोमांच तिला वाटला. अंगावर काटा आला, स्वामींच्या उत्सव मूर्तीचे ते प्रसन्न रूप पाहून डोळे भरून आले. आजूबाजूच्या जगाचा जणू तिला विसरच पडला. मागच्या खूप दिवसात इतका आनंद तिला झाल्याचे आठवतच न्हवते. आरती झाली एवढ्यात सिध्दार्थची हाक ऐकून वसुधाने मागे वळून पाहिले. खोलीत ती न दिसल्याने घाबरून तिला शोधत तो मंदिरापर्यंत आलेला. वसुधा न सांगता आल्यामुळे जरा रागातच होता तो,पण तिला पाहताच शांत झाला.

सिद्धार्थ :- " अगं काय, सांगून तरी यायचं ना, किती घाबरलो मी..एकटीच आलीस ते"

वसुधा :- " अरे एकटी कुठे या काकू होत्या ना सोबत", असे म्हणत वसुधा काकूंच्या दिशेने वळली तर तिथे कुणीच न्हवतं. "अरेच्चा काकू कुठे गेल्या??"

सिद्धार्थ :-" कालपासून ती बाई काही तुझी पाठ सोडत नाहीये. आणि कुठाय आता? ते राहूदे, चल आपल्याला निघायचंय बसची वेळ होईल".

दोघांनीही स्वामींचे परत एकदा मनोभावे दर्शन घेतले, आपली कूस उजवण्यासाठी मनातल्या मनात वसुधाने गाऱ्हाणं घातलं आणि ते परतीच्या प्रवासाला लागले. आल्यावर नेहमीसारखे दिवस पुढे सरकत होते. नोकरी, घर रुटीन सुरू होतं. औषधांना कंटाळून डॉक्टरच्या फेऱ्याही तिने बंद केल्या होत्या. देवाच्या मनात असेल तर होईल असे म्हणून तिने तात्पुरता का होईना विषय थांबवला होता.

त्या दिवशी सकाळी एका अनामिक भितीयुक्त आनंदाची जाणीव तिला झाली. तिची पाळी या महिन्यात चुकली होती म्हणून तिचे लक्ष न्हवते आज जास्त कुठं. उगाचंच वाटून गेलं मनात काहीतरी म्हणून घरातच प्रेग्नन्सी टेस्ट केली , तर काय आश्चर्य!! टेस्ट पॉसिटीव आली, वसुधाचा आनंद गगनात मावेना. तिने पटकन जाऊन देवासमोर साखर ठेवली. पण अजून ही बातमी तिने कोणालाही सांगितली न्हवती. त्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकली आणि डॉक्टरची संध्याकाळची अपॉईंटमेंट घेतली , सिद्धार्थला घरी लवकर ये म्हणून कळवले. नेमकं त्याच दिवशी जास्त काम असल्याने तो थोडासा वैतागला खरा पण बायकोची तब्येत बरी नाही म्हणल्यावर तो तयार झाला.

गायनॅक कडे जायचं असं वसुधाने सांगितल्यावर सिद्धार्थ ला वाटलं पुन्हा एकदा ट्रीटमेंट साठी तयार झाली की काय ही, म्हणून तो ही खुश झाला. फार काही प्रश्न न विचारता दोघे निघाले. इकडे अख्खा दिवस वसुधाने कसा काढलेला तिचं तीला माहित... इंटरनेट वर माहिती पाहिली, देवाचा कौल घेतला,आईला तरी सांगावं असं वाटून मोबाईल चार वेळा हातात घेतला आणि परत ठेवून दिला. तिला वाटलं एवढी घाई बरी नाही. मुळातच समंजस असल्यामुळे मनाला आवर घातला तिने... तिकडे डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सिद्धार्थ तर नाचायचाच बाकी होता, एकतर खूप मोठं सरप्राइज होतं हे त्याच्यासाठी ... तो बाबा होणार होता...

झालं.. घरातलं वातावरण त्यादिवशी पासून एकदम बदललं. वसुधाच्या खाण्या पिण्याची, तब्येतीची सर्वजण खूप काळजी घेऊ लागले. सासूबाई सुनेच्या काळजीपोटी गावाहून तिच्याजवळ राहायला आल्या. तिला काय हवं नको ते त्या जातीने बघायच्या. दिवस सरत होते , वसुधाचे गरोदरपण छान सुरू होते. एके दिवशी मात्र सगळ्याला दृष्ट लागावं असं काहीसं झालं. अचानक वसुधाच्या पोटात दुखायला लागलं, सिद्धार्थने क्षणाचाही विलंब न लावता तिला दवाखान्यात हलवलं. जुलै महिना, तुफान पाऊस त्यात रात्रीची वेळ अशा परिस्थितीत सिद्धार्थ आणि त्याचे आई बाबा वसुधाला घेऊन दवाखान्यात कसेबसे पोहचले. नर्सने चेक केल्यावर कळले की बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झालेत आणि बाळ पोटात आडवं झालंय , लगेच ऑपरेशन करावे लागेल. ताबडतोब वसुधाला त्यांनी ऑपरेशन थेटर मधे नेलं, इकडे दवाखान्याचे सगळे सोपस्कार सिद्धार्थने लगेच पूर्ण केले, पण प्रॉब्लेम हा होता की त्या रात्री पुण्यात खूप पाऊस होता, नदी नाले ओसंडून वाहत होते, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरून गेले होते. मिळेल तसा प्रत्येक जण घरी सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होता , ट्रॅफिक यंत्रणेने कधीच हात टेकले होते. या गोंधळात वसुधाचे जे डॉक्टर होते त्यांची गाडी याच कारणामुळे रस्त्यात अडकून पडली होती त्यामुळे त्यांना यायला उशीर होत होता. ईकडे वसुधाची तब्येत नाजूक होत चालली होती. तिचे सासू सासरे तर अखंड देवाचा धावा करत होते. अचानक सासूबाईंना स्वामींची आणि वसुधाच्या स्वामीभक्तीची आठवण झाली, त्यांनी स्वामींचा जप सुरू केला. नर्सच्या ऑपरेशन थेटर मधून फेऱ्या,दवाखान्याच्या स्टाफची डॉक्टरना फोन करायची गडबड , सिद्धार्थचे हताश होऊन आपल्या बायको आणि बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न हे सगळे वातावरण सुन्न करणारे होते. बाहेरच्या पावसाच्या आवाजात यांचा हा केविलवाणा आवाज कुठेतरी दबला होता.

थोड्याच वेळात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली, सर्वाना वाटलं डॉक्टर आले पण त्या ठिकाणी दुसरीच स्त्री होती, घाईने ती रिसेप्शन जवळ गेली आणि तिथे तिने काहीतरी सांगितले की ज्यामुळे तिथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा उत्साह आला . त्या स्त्रीला त्यांनी पटकन ऑपरेशन थेटर कडे नेले आणि नर्स बाहेर येऊन सिध्दार्थला म्हणाली,

"काळजी करू नका, डॉक्टरना येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्याच्या एका ओळखीच्या इथे जवळच राहणाऱ्या त्या डॉक्टर मॅडमना ऑपरेशन साठी पाठवले आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिन्त राहा".

सर्वांचा चेहऱ्यावर एक हुशारी आली. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला. तो निरोप देऊन गेलेली नर्स पांढऱ्या स्वच्छ कापडात गुंडाळून गोरी गोरी पान, पिंगट डोळ्याची परी अलगद घेऊन सिद्धार्थच्या समोर येऊन म्हणाली," अभिनंदन, लक्ष्मी आली".... सिध्दार्थच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या आई बाबांनाही तो जीव पाहून रडू आवरले नाही. तो चिमुकला जीव हातात घेत सिध्दार्थने नर्स ला विचारले, "वसुधा?? माझी वसुधा ठीक आहे ना??".. नर्सने होकारार्थी मान हलवून सांगितले, " हो त्याही ठिक आहेत,थोड्या वेळात शुद्धीवर येतील. डॉक्टर वेळेत आल्या म्हणून सगळं नीट झालं, देवाने तुमचं ऐकलं.."

सिद्धार्थ :- "नर्स, मला त्या मॅडमना भेटायचं आहे, कुठे आहेत त्या?"..

नर्स :- "हो आहेत इथेच येतच असतील "असे म्हणून ती आत गेली

थोड्या वेळाने नर्सने बाहेर येऊन सिध्दार्थला सांगितले की ,"बहुतेक डॉक्टर मॅडमना काही दुसरे काम निघाले आणि त्या कुणालाही न सांगताच निघून गेल्या गडबडीने." सिद्धार्थ म्हणाला, "काही हरकत नाही , तुम्ही मला त्यांचे नाव सांगा मी उद्या स्वतः जाऊन त्यांचे आभार मानतो". नर्स म्हणाली, "डॉक्टर अष्टपुत्रे"....सिध्दार्थला हे नाव नुकतेच कुठेतरी ऐकल्यासारखे वाटले पण त्यावेळी हा विचार करण्याच्या अवस्थेत तो न्हवता. तो फक्त आणि फक्त आपली बायको आणि बाळ वाचलं या आनंदात होता.

सकाळ झाली, पावसाचा जोर ओसरला होता पण खूप उलथापालथ झाली होती, गाड्या , जनावरं, माणसे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. अनेक ठिकाणी तर रस्तेही पाण्याच्या वेगामुळे वाहून गेले होते. दवाखान्यात मात्र वसुधा आणि तिच्या बाळाचा नवीन जन्मच झालेला त्याच आनंदात सगळे होते. एवढ्यात वसुधाचे नेहमीचे डॉक्टर नर्सला घेऊन वसुधाला बघायला आले तेव्हा त्यानी जे सांगितलं ते ऐकून सगळेच अवाक् झाले, ते डॉक्टर म्हणाले ,"काल इतका प्रचंड पाऊस होता की माझी गाडी एक खड्ड्यात अडकून बसली आणि ती काढायच्या नादात माझा मोबाईल कुठेतरी पडला त्यामुळे मी कुठेच फोन करू शकलो नाही, दवाखान्यातही नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर अष्टपुत्रे नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही आणि मी त्यांना इथे पाठवले न्हवते... वसुधा, देवदूतच आलेला तुला आणि तुझ्या बाळाला वाचवायला"...

वसुधाने बाळाकडे एक क्षण पाहिले , तिच्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टर गेल्यावर ती म्हणाली, "सगळी स्वामींची कृपा!! तुला आठवतंय सिद्धार्थ, आपल्याला जी बाई आपल्याला स्वामींच्या देवळात भेटलेली तिने त्या दिवशी बोलताना तिचे नाव काय सांगितले होते??...." सिद्धार्थ एकदम चमकला आणि म्हणाला..." मी अष्टपुत्रे... पुण्याहूनच आलेय"...


समाप्त-

सौ. शर्वरी कुलकर्णी.
94 views0 comments

SHREE. SWAMI SAMARTH Publishers

Real Homes, Madhuvan Township, Gokhivre Road 

Maharahtra, Mumbai, Vasai East

401208

Admin-E-mail

nayanambavkar@gmail.com

Be The First To Know

Sign up for our newsletter